लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वितरण

जळगाव जामोद ( प्रतिनिधी )

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी स्थानिक तहसील कार्यालयात आमदार तथा योजनेच्या समितीचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
महिलांना आरोग्याच्या विविध योजना, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना व उद्योगात उभारी देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी या सर्व भावांचा भक्कमपणे आधार राहील, असे प्रतिपादन यावेळी आमदार डॉ. कुटे यांनी केले. यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य पुरुषोत्तम शेगोकार, प्रमोद गोसावी, तहसीलदार शीतल सोलाट, बाल विकास अधिकारी प्रमोद मानकर, सहाय्यक गट विकास अधिकारी मोरे, विस्तार अधिकारी पूजा नलवडे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. महिलांनी यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांना राखी बांधून कार्यक्रमाचा समारोप केला.