५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा

 ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा


राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती. बावनकुळे यांनी शपथविधीची वेळ आणि तारखी सांगितली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असेल आणि मंत्रिमंडळ असे असेल याचे उत्तर मिळालेले नाही. 

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ३ तारखेला दुपारी १ वाजता होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत. 

बैठकीत विधीमंडळातील नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात भाजपचे 25 कॅबिनेट मंत्री, शिवसेना 9 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री तर राष्ट्रवादी 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री यांचा शपथविधी होईल. यात गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहणार असल्याचे समजते.