बुलढाण्यात विविध देशांमधील भिक्खूंच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारीला जागतिक धम्म परिषदेचे तसेच बेरोजगारांसाठी बिझनेस एक्स्पोचेही आयोजन

बुलढाण्यात विविध देशांमधील भिक्खूंच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारीला जागतिक धम्म परिषदेचे तसेच बेरोजगारांसाठी बिझनेस एक्स्पोचेही आयोजन 


विजय दोडे 
(मोताळा तालुका प्रतिनिधी)


बुलढाणा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट कॉलेज) प्रांगणात 02 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक धम्म परिषद व बिझनेस एक्स्पो पार पडणार आहे. धम्म परिषदेला विविध देशातील भिक्खू संघ संबोधित करणार आहेत. या सोबतच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने बिझनेस एक्स्पोचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
धम्म परिषदेच्या आनंदी पर्वावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘मूकनायक बुलढाणा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात ही परिषद व बिझनेस एक्स्पो घेण्यात येत आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, मूकनायक फाउंडेशन व महार रेजिमेंट यांचा विशेष सहभाग राहणार आहे.
बिझनेस एक्स्पोसाठी जिल्हा खादी ग्रामद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, विविध राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था तसेच विविध बचत गटांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बुलढाण्यात होणारी जागतिक धम्म परिषद ऐतिहासिक करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. ही परिषद अविस्मरणीय राहावी, याकरिता जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना ‘मूकनायक बुलढाणा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विविध देशांमधील नामवंत भिक्खूंच्या साक्षीने पार पडणाऱ्या धम्म परिषदेला तमाम धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे.




भाजपा शिक्षक आघाडीच्या संग्रामपूर तालुका संयोजक ( अध्यक्ष ) पदी श्री. प्रविण आगरकर सर यांची नियुक्ती
                
जळगाव जामोद (प्रतिनिधी) 

भाजपा शिक्षक आघाडीच्या संग्रामपूर तालुका संयोजक पदी श्री. प्रविण आगरकर सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. सौ. संगीताताई शिंदे ( बोंडे ) यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले आहे.
          यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे बुलडाणा जिल्हा संयोजक श्री.प्रकाश बोदडे सर, सहसंयोजक श्री. गजाननराव गि-हे सर, सदस्य श्री. पाटील सर व भाजपा शिक्षक आघाडीचे मार्गदर्शक श्री. पंकज हळवे सर उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह जळगाव जामोद येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमा दरम्यान ही नियुक्ती करण्यात आली.
               श्री.प्रवीण आगरकर सरांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, शिक्षक बांधवांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा समन्वय साधून शिक्षणक्षेत्राला, शिक्षक बांधवांना नक्कीच न्याय देता येईल असे मत भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ.सौ.संगिताताई शिंदे ( बोंडे ) यांनी व्यक्त केले आहे.