राजू बडेरे
(मुख्य संपादक)
स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकग्राम ज्ञानगंगापूर तालुका खामगांव येथे सुरू आहे.४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता बौध्दीक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश बोदडे सर बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. दीपक नागरिक यांनी केले.या कार्यक्रमाच्या बौद्धिक सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाशजी बोदडे सर यांनी स्वामी विवेकानंदाचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांचे तत्त्वज्ञान व युवकांनी आपल्या जीवनात अंगीकारलेल्या तत्त्वांचा आजच्या तरुणांनी आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा असे प्रतिपादन आपल्या भाषणात त्यांनी केले.पुढे ते म्हणाले की भारत मातेची सेवा करण्यासाठी देश कार्यासाठी समर्पित जीवन आपल्याला कसे जगता येईल या साठी स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन आपण काम करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वामीजींनी त्यावेळच्या काळातील रूढी अंधश्रध्दा यांना विरोध करून विज्ञानवादी विचार मांडले व भारतीय समाजव्यवस्थेला नवा आयाम दिला असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा.उमेश खंदारे यांनी सांगितले. सांप्रत जीवन व स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्याचा अभ्यास यावर विद्यार्थ्यांसोबत हितगुज करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांच्या संख्येचे निरसन यावेळी प्रकाश बोदडे सर यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक श्री.नारायणराव बोदडे, सौ.वैशालीताई प्र. बोदडे,महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. नीता बोचे व प्रा.कोमल काळे या मंचावर उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे संचलन कु.शेजल वानखडे हिने केले तर आभार प्रदर्शन सुमित वानखडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो च्या सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली.